जळगाव (प्रतिनिधी) राज्यात शिंदे सरकार आल्यापासून शिवसेना नेता तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘शिव संवाद’ यात्रा सुरु केली आहे. आत्तापर्यंत या यात्रेचे तीन टप्पे पुर्ण झाले आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांची प्रकृती खालावल्यामुळे यात्रेचा चौथा टप्पा रद्द करण्यात आला आहे. या यात्रेतील जळगाव जिल्हा दौराही यामुळे रद्द झालाय.
राज्यात सत्तांतर झाले. भाजपसोबत एकत्र येत एकनाथ शिंद आणि त्यांच्यासोबत असलेल्या 40 आमदारांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं आहे. दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले असून, तेही राज्यभर दौरे काढत आहेत. आपल्या दौऱ्यात बेकायदेशीर सरकार आणि बंडखोर आमदारांवर आदित्य तोफ डागताना दिसून येतात.
उद्या शिवसंवाद यात्रेचा चौथा टप्पा होणार होता. मात्र, त्यांची तब्येत खालावल्यामुळे ९ आणि १० ऑगस्ट रोजी होणारा शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा रद्द करण्यात आला आहे. जळगांव, मालेगांव, नाशिक, आणि भिवंडी दरम्यान शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान चौथ्या टप्प्यात नवी तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे म्हटले आहे.