पाटणा (वृत्तसंस्था) जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी आपली जमीन दान करत एका मुस्लीम कुटुंबाने जातीय सलोख्याचं उदाहरण दिलं आहे. धर्माच्या भिंती ओलांडत बिहारमधील कुटुंबाने तब्बल अडीच कोटींची जमीन विराट रामायण मंदिरासाठी दिली आहे.
२.५ कोटी रुपयांची जमीन दान
बिहार मधील एका मुस्लिम कुटुंबाने तेथील पूर्व चंपारण जिल्ह्यातील कैथवालिया परिसरात उभारल्या जाणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी (विराट रामायण मंदिर) २.५ कोटी रुपयांची जमीन दान केली आहे. पाटणा येथील महावीर मंदिर ट्रस्टचे प्रमुख आचार्य किशोर कुणाल यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, ही जमीन गुवाहाटी येथे राहणारे पूर्वीचे चंपारण येथील व्यापारी इश्तियाक अहमद खान यांनी दान केली आहे. माजी सनदी पोलिस अधिकारी राहिलेले आचार्य किशोर कुणाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, “इश्तियाक अहमद खान यांनी नुकतेच केसरिया उपविभाग (पूर्व चंपारण) च्या निबंधक कार्यालयात मंदिराच्या बांधकामासाठी आपल्या कुटुंबाची जमीन दान करण्यासंबंधीची सर्व औपचारिकता पूर्ण केली.”
महावीर मंदिर ट्रस्टला आतापर्यंत १२५ एकर जमीन मिळाली
खान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दान केलेली ही जमीन म्हणजे दोन समाजातील सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण असल्याचे आचार्य म्हणाले. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारणे कठीण झाले असते, असेही ते म्हणाले. या मंदिराच्या उभारणीसाठी महावीर मंदिर ट्रस्टला आतापर्यंत १२५ एकर जमीन मिळाली आहे.
या नियोजित मंदिर संकुलात उंच शिखरांसह 18 मंदिरे असतील आणि त्याच्या शिवमंदिरात जगातील सर्वात मोठे शिवलिंग असेल. एकूण बांधकाम खर्च अंदाजे 500 कोटी रुपये आहे. ट्रस्ट लवकरच नवी दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या बांधकामात गुंतलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे.