मुंबई (वृत्तसंस्था) अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने ही कारवाई केली आहे. त्यामुळे सदावर्ते आता दोन वर्षांसाठी कोणत्याही कोर्टात वकिली करु शकणार नाहीत, किंवा कुणाचीही बाजू मांडू शकणार नाहीत.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिली आचारसंहितेचं उल्लंघन करुन, वकिली गणवेशात आंदोलनात भाग घेतल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अॅड सुशील मणचेकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर बार कौन्सिलने पुढील २ वर्षांसाठी सदावर्तेंची वकिली सनद निलंबित करण्याचा निर्णय दिला. गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलाचा गाऊन आणि बँड परिधान करून मुंबईत विविध आंदोलनात हजेरी लावली होती. तसेच त्या ड्रेसमध्ये त्यांनी विविध प्रकारची घोषणाबाजीही केली होती.
अशा कृत्यामुळे समस्त वकिलांची प्रतिमा मलिन होत असल्याचं म्हणत सदावर्ते यांच्या विरोधात वकील सुशील मणचेकर यांनी शिस्त पालन याचिका तक्रार केली होती. आज याबद्दल बार कौन्सिलच्या तीन सदस्यीय समितीने निकाल देत सदावर्ते यांची दोन वर्षे सनद रद्द केली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर या आधीही अशी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही सदावर्ते यांनी त्या निर्णयाला आव्हान दिलं होतं.