धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रसिद्ध वकील अॅड. हरीहर पाटील यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहित उद्धव ठाकरेंचे चोरीला गेलेले वडील शोधून देण्याची अजब मागणी केली आहे. अॅड. पाटील यांच्या या मागणीवर पोलीस महासंचालकांकडून उत्तर येते किंवा नाही?, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
अॅड. हरीहर पाटील यांनी १२ मे रोजी राज्याचे पोलीस महासंचालक यांना एक मेलद्वारे एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सध्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख उद्धव ठाकरे जुन २०२२ नंतर विविध सभांमध्ये आणि सर्व माध्यमांना बाप चोरणारी टोळी आली आणि त्यांचा बाप चोरला असे सातत्याने जाहिरपणे सांगत आहेत. तरीही महाराष्ट्राच्या गृह खात्याने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही, ही अंत्यत खेदाची बाब आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याचा बाप चोरीला जाणे ही बाब महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिष्ठेला भुषणावह नाही.
माझ्या उत्तम माहिती व ज्ञानानुसार आदरणीय बाळ केशव ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील होते ज्यांचा जन्म २३ जानेवारी १९२६ आणि मृत्यु दि. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाला. परंतू त्यांच्या मृत्युस सुमारे १० वर्षे झाल्यानंतरही बाप चोरणारी टोळी आली आणि त्यांचा बाप चोरला असे उद्धव ठाकरे जाहिरपणे सांगत आहेत. तरी याबाबत चोरीला गेलेल्या बापाची निश्चिती करुन त्यांचा चोरीला गेलेला बाप त्यांना लवकरात लवकर मिळवून द्यावा ही विनंती. तसेच याच बरोबर त्यांचे आणखी काय काय चोरीला गेले त्याचीही चौकशी, तपास आणि योग्य ती कार्यवाही करुन त्यांचेवरील अन्याय दुर करावा ही विनंती, असेही अॅड. हरीहर पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.