जळगाव (प्रतिनिधी) शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ ची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली असून तिचा कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने जळगाव शहरातील विविध वार्डातून अनेक तक्रारी/ हरकती या मनपामध्ये दाखल झालेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव शहरातच दुबार मतदारांची संख्या ही जास्त असल्याचे देखील समोर आले आहे, या सोबतच मोठ्या प्रमाणावर घोळ देखील असल्याचे समोर आले आहे.
मनपा प्रभाग ५ चर्चेचा विषय :
जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक तक्रारी/ हरकती या प्रभागांमधून संभाव्य उमेदवार सामाजिक कार्यकर्ते ॲड.पियुष पाटील यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या आहेत. पाटील यांनी म्हटले आहे की प्रभाग क्रमांक : ५ मध्ये जिल्ह्यातील सर्वात जास्त बोगस/ दुबार मतदार असून यांची संख्या ५८०० च्या घरात आहे. आमचा प्रभाग हा ४०% कमर्शियल असून एवढी मतदार यांची संख्या होतेच कशी असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला आहे.
ना.उच्च न्यायालयात २०१३ च्या आदेशाचा संदर्भ
जळगाव शहर महानगरपालिकेचे तत्कालीन लढवय्या नगरसेवक स्व. नरेंद्रअण्णा पाटील यांनी सन २०१३ मध्ये प्रभागातील तसेच शहरातील असलेले दुबार/ ग्रामीण भागातील बोगस मतदार इ. यांच्या स्पॉट व्हेरिफिकेशन व पंचनामे करून चिन्हांकित करण्याबाबत ना.उच्च न्यायालयात रिट पीटिशन दाखल केलेले होते. त्या अनुषंगाने त्यावेळी जळगाव शहरातील तब्बल ६६७३३ संशयित बोगस मतदार हे चिन्हांकित करण्यात आले होते. यामध्ये तेव्हाच्या प्रभाग क्रमांक २० (सध्याचा प्रभाग क्रमांक : ५) मध्ये तब्बल ३८०० बोगस मतदार हे चिन्हांकित करण्यात आले होते. तसेच संबंधितांना मतदानावेळी ४ पुरावे हे अनिवार्य करण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे यापैकी केवळ ६ मतदार हे आपल्या रहिवासाचे पुरावे आणण्यात यशस्वी ठरले होते. सदर चिन्हांकित मतदार हे सुद्धा प्रारूप मतदार यादीतून डिलीट/वगळणे अपेक्षित असताना कुठल्याही स्पॉट व्हेरिफिकेशन न करता काढले जातात, यामागे मोठी राजकीय शक्ती असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. यामुळे सन २०१३ मध्ये ना.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान झाले असल्याचे देखील म्हटले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त, जळगाव शहर मनपा आयुक्त पार्टी :
तक्रारदार ॲड. पियुष पाटील यांनी वेळोवेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त, निवडणूक उपायुक्त, अतिरिक्त उपायुक्त यांना याबाबत वेळोवेळी संबंधित प्रकार लक्षात आणून दिल्यावर सुद्धा यावर कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर देखील संशय निर्माण केलेला आहे. याबाबत तक्रार देखील करण्यात येणार आहे. तत्पूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना देखील या रीट पिटीशन मध्ये पार्टी केले गेले असल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित अधिकाऱ्यांना आता न्यायालयीन बाजूला सामोरे जावे लागणार आहे.
विष्णू भंगाळे यांनी सर्वेक्षण थांबविल्या प्रकरणी राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार :
गेल्या दोन दिवसाला प्रभागात बोगस मतदारांची सर्वेक्षण मनपा अभियंता/कर्मचारी यांच्यामार्फत सुरू असताना विष्णू भंगाळे यांनी हस्तक्षेप, दमदाटी करून हाकलून लावले होते. याप्रकरणी राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. विष्णू भंगाळे हे जळगाव शहर महानगरपालिकेचे माजी महापौर तसेच ते सध्या स्थितीत विद्यमान सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष असल्याने ते त्यांच्या पदाचा दुरुपयोग करीत असल्याचे म्हटले आहे.
न्यायालयीन लढाई निमित्त स्व.नरेंद्र अण्णांच्या आठवणींना उजाळा :
स्व.नरेंद्र अण्णा पाटील जळगाव जिल्ह्यातील लढवय्या व्यक्तिमत्व म्हणून ओळख होती, तसेच ते न्यायालयाचे व्हिसल ब्लोअर (भ्रष्टाचाराविरुद्ध शंखनाद करणारा) म्हणून देखील ओळखले जायचे स्व.नरेंद्रअण्णा यांनी जळगाव शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक मोठ मोठे विषयांमध्ये न्यायालयीन लढा देऊन आपली बाजू मांडली तसेच सत्य हे लोकांसमोर आणले. सन २०१३ मध्ये मनपाच्या सार्वत्रिक निवडणूक वेळी स्व.नरेंद्रअण्णा यांनी ना.उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करून याबाबत आदेश आणले होते. अगदी त्याच पद्धतीने त्याच आदेशाचा आधार घेत त्यांचे पुत्र ॲड.पियुष नरेंद्र पाटील यांनी देखील बोगस मतदार प्रकरणी ना.उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले आहे. यामुळे नरेंद्र अण्णा यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. याप्रकरणी आता भंगाळे यांच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.















