काबूल (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानात रविवारी भीषण युद्ध झालं. तालिबानी हल्ल्यांचा सामना करताना राजधानी काबूल पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. दरम्यान अफगाणिस्तानचे राष्ट्पती अशरफ घनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं समजत आहे.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांनी अखेर तालिबान्यांसमोर शरणागती पत्करली आहे. अशरफ घनी यांनी अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तालिबान कमांडर मुल्ला अब्दुल गनी ब्रार दोहाहून काबुलला पोहोचल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ते अफगाणिस्तानचे नवे राष्ट्रपती होऊ शकतात.
तत्पूर्वी, तालिबान लढाऊंनी रविवारी राजधानी काबुलच्या बाहेरील बाजूस सर्व बाजूंनी घुसखोरी सुरू केली. काबुलच्या बाहेर मोठ्या संख्येने तालिबान लढाऊ उपस्थित आहेत आणि काबूलच्या आकाशात धूर आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. येथे लष्कराची हेलिकॉप्टर काबूलच्या आकाशात घिरट्या घालत आहेत. काबूलकडे जाणारे जवळजवळ सर्व रस्ते तालिबान्यांनी व्यापले आहेत. येथे अफगाणिस्तानच्या अंतर्गत मंत्र्यांनी सांगितले की, काबूलवर हल्ला झाला नाही. ते म्हणाले की, सत्ता हस्तांतरण शांततेत होईल. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी म्हणाले की काबूलमधील परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्याची गरज नाही. येथे सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयातून घरी पाठवण्यात आले आहे.
कोणालाही इजा पोहोचवण्याच आमचा हेतू नाही – तालिबान
दुसरीकडे, तालिबानने एक निवेदन जारी करून सांगितले की, ते चर्चेद्वारे शांततेने काबूलमध्ये प्रवेश करणार आहेत. जबरदस्तीने प्रवेश करण्याचा कोणताही हेतू नाही. तालिबानने पुढे म्हटले की, सरकारशी चर्चा सुरू आहे, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही. तालिबानने म्हटले आहे की, ‘कोणाच्याही जिवाला, मालमत्तेला, सन्मानाला हानी पोहचणार नाही आणि काबूलमधील नागरिकांच्या जीवाला धोका होणार नाही.’