मुंबई (वृत्तसंस्था) अमेरिकेने २००१मध्ये तालिबानला अफगाणिस्तानच्या सत्तेतून खाली खेचले पण आता तालिबान अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. त्यांनी अफगाणिस्तान मधील महत्त्वाची शहरे, सैनिकी तळ, गावं ताब्यात घेतली. अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ ला दहशतवादी हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनला तालिबानने पाठिंबा दिला होता. या निमित्ताने जाणून घ्या…तालिबानी म्हणजे नेमके कोण? आणि त्यांचा लढा कशासाठी आहे ते?.
तालिबानी म्हणजे नेमके कोण ?
मुल्ला मोहम्मद उमरने १९९४ मध्ये आपल्या डझनभर अनुयायांसह तालिबानची स्थापना केली आणि गृहयुद्धात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला आव्हान दिले. परंतु गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराला संपवण्याच्या उद्देशाने सत्तेत आलेला तालिबानने लोकांना त्रास द्यायला सुरूवात केली. पश्तोमध्ये तालिबानचा शाब्दिक अर्थ ‘विद्यार्थी’ आहे. हा शब्द संस्थापक सदस्य मुल्ला मोहम्मद उमरचा विद्यार्थी असल्याचा संदर्भ आहे. या गटाने मूळतः तथाकथित ‘मुजाहिदीन’ सेनानींना आकर्षित केले ज्यांनी तत्कालीन यूएसएसआर सैन्याला १९८० च्या दशकात अफगाणिस्तानातून हाकलून लावले. यानंतर तालिबानने १९९६ मध्ये अफगाणिस्तानवर कब्जा केला. तालिबानने पाच वर्षे देशभर सरकार चालवले. त्याच वेळी, २००१ मध्ये, अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानात घुसून तालिबानला सत्तेतून बेदखल केले. मुल्ला मोहम्मद उमर अमेरिकेमुळे अज्ञातवासात गेला.
ओसामा अमेरिकेवर हल्ल्याचं नियोजन करत असताना त्याला तालिबानने मदत केली होती. तालिबानने जेव्हा ओसामा बिन लादेनला आपल्या स्वाधिन करण्याची अमेरिकेची मागणी फेटाळली तेव्हा अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये घुसून तालिबानची सत्ता उलथवून टाकली. मुल्ला ओमरसह काही संस्थापक सदस्यांना शेजारी पाकिस्तानमध्ये जागा तर मिळाली. पण त्यांनी अस्तित्वासाठी लढाई सुरुच ठेवली. फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबानमध्ये एक ऐतिहासिक करार झाला, ज्यानुसार अमेरिकेने पुढील १४ महिन्यात आपलं सैन्य काढून घेणार असल्याचं जाहीर केलं.
तालिबानचा लढा कशासाठी?
अमेरिकेच्या समर्थनाने स्थापन झालेलं सरकार उलथवून टाकणे आणि कट्टर इस्लामिक सरकारची स्थापना हा तालिबानचा हेतू आहे. पश्चिमेला कोणताही धोका नसेल असं सर्वसमावेशक सरकार देशाला देणं हा आमचा हेतू असल्याचं तालिबानचे नेते सांगतात, पण या संघटनेने अफगाणिस्तानमध्ये कठोर निर्बंध लादले आहेत.
तालिबानच्या म्हणण्यानुसार, देशातील नागरिकांना आमच्यापासून कोणताही धोका नसेल आणि सरकारसाठी काम करणाऱ्यांना माफी दिली जाईल. मात्र तालिबानने कब्जा केलेल्या भागातून पळून आलेले नागरिक सांगतात, की तालिबानकडून नागरिकांवर अमानुष अत्याचार केले जात आहेत, शिवाय महिलांना बंदुकीचा धाक दाखवून कामाच्या ठिकाणाहून घरी पाठवलं जात आहे. यासोबतच कैदेत असलेल्या सैनिकांची हत्याही केली जाते.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं नेतृत्त्व कुणाकडे?
मुल्ला ओमरचा २०१३ मध्येच मृत्यू झाला, पण याची अधिकृत घोषणा तालिबानने २०१५ पर्यंत केली नाही. २०१६ मध्ये अमेरिकच्या ड्रोन स्ट्राईकमध्ये मुल्ला ओमरचा उत्तराधिकारी मुल्ला अख्तर मोहम्मद मन्सूरचाही मृत्यू झाला. तेव्हापासून तालिबानचं नेतृत्त्व मौलवी हैबतुल्ला अखंदजादा या पश्तुन जमातीच्या नेत्याकडे आहे. तालिबानच्या नेत्यांची एक परिषद आहे, जी पाकिस्तानमध्ये स्थायिक असून त्याचं नाव क्वेटा शुरा आहे. तालिबानची सर्व सूत्र या परिषदेच्या मार्गदर्शनाखाली हलवली जातात.
तालिबानच्या उत्पन्नाचा सोर्स काय?
अफगाणिस्तानमधील अवैध ड्रग व्यवसाय हा तालिबानच्या पैशांचा मुख्य स्रोत आहे. अफगाणिस्तानचा इतिहास हा अफूशी जोडला गेलाय. आताही तालिबानच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा सोर्स हा नशेचा बाजारच मानला जातो. एवढच नाही तर ज्या भागात तालिबानचा कब्जा आहे, तिथं मोठा टॅक्स वसूल केला जातो. अनेक गुन्हेगारी स्वरुपाची कामही तालिबान करतं, ज्यातून त्यांना भरपूर पैसा मिळतो. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोच्या अंदाजानुसार तालिबानकडून दरवर्षाला १.६ बिलियन अमेरिकन डॉलर एवढा पैसा उभा केला जातो.