पुणे (वृत्तसंस्था) अनलॉकिंगला सुरुवात झाल्यानंतर हळू-हळू अनेक गोष्टी पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर तब्बल ८ महिन्यानंतर पुण्यातील गिर्यारोहणाला परवानगी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील गड किल्ले आजपासून पर्यटकांसाठी तसेच गिर्यारोहकांसाठी खुले झाले आहेत.
गड-किल्ल्यावर सह डोंगर कड्यांवर भटकंतीस तसेच ट्रेकिंगसाठी जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र त्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गिर्यारोहणाला परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने केली होती. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी पुण्याजवळच्या गड-किल्ल्यांवरील गिर्यारोहणाला परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र आता सर्वत्र लॉक डाऊन शिथिल झालं आहे. शहरांतील बाजारपेठा, मैदाने, उद्याने तसेच बागा देखील उघडल्या आहेत. अशा परिस्थितीत गड किल्ल्यांचे दरवाजे उघडण्याची मागणी होत होती. जिल्हा प्रशासनाने ती आता मान्य केली आहे.