एरंडोल (प्रतिनिधी) भरधाव जाणाऱ्या आयशरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात २२ वर्षीय युवक जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात ३ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावरील उमरदे जवळील पुलाजवळ झाला.
खेडगाव तांडा (ता.एरंडोल) येथील भाईदास संतोष राठोड व संदीप खिमा जाधव हे दुचाकीने (एम.एच.४९ बी. जी. ४५८४) बुधवारी सायंकाळी पाच वाजता एरंडोल येथून कपडे व अन्य वस्तूंची खरेदी करून खेडगाव तांडा येथे जात होते. उमरदे गावाजवळ त्यांच्या दुचाकीला आवशरने (डी.एन.०९. एन. ९८९०) धडक दिली. यात संदीप खिमा जाधव हा जागीच ठार झाला, तर भाईदास राठोड गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर संदीप जाधव यांच्या मागे दुचाकीने येणारे मृत संदीपचे मामा सुनील राठोड व दिनेश रमेश पवार यांना अपघात झाल्याचे दिसले. नंतर उमरदे येथील ग्रामस्थांनी आयशर थांबवली. सुनील राठोड व दिनेश पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यावेळी संदीप जाधवला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. जखमी भाईदास राठोडवर उपचार सुरु आहेत. याबाबत आयशरचालक महेंद्रसिंग प्रतापसिंग राजपूत (रा. दादरा नगर हवेली ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.