सोलापूर (वृत्तसंस्था) शेतकऱ्याकडून दहा हजार रुपयाची लाच घेताना करमाळयाचा कृषी पर्यवेक्षकाला शुक्रवारी दुपारी लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. भारत मारुती शेंडे, असे संशयित आरोपी कृषी पर्यवेक्षकाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, तक्रारदार शेतकऱ्याने महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर पॉवर टिलर खरेदीसाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर झाल्यानंतर त्या शेतकऱ्याने पॉवर टिलर खरेदी करून त्याबाबतची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केली व ती कागदपत्रे करमाळा कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक भारत मारुती शेंडे यांच्याकडे सादर केली. परंतु सदर कागदपत्रांचे रिपोर्ट शेंडे यांनी शासनाकडे सादर न केल्याने तक्रारदाराचे अनुदान बँक खात्यावर जमा होऊ शकले नाही.
तक्रारदार शेतकऱ्याने याबाबत शेंडे यांच्याकडे चौकशी केली असता, कागदपत्रे पडताळणी करून अपलोड करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. परंतू तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने अँटी करप्शन यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाच मागितल्याची खात्री केल्यावर शुक्रवारी दुपारी कार्यालयातच सापळा रचून शेतकऱ्याकडून १० हजार रुपयाची लाच घेताना भारत शेंडे याला रंगेहाथ पकडण्यात आले.