मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने राजकारणीकडे आपला मोर्चा वळवलेला दिसत आहे. राज्याचे कृषीमंत्री व शिवसेना नेते दादाजी भुसे यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कृषीमंत्री दादाजी भुसे यांना अचानक पाठीचे दुखणे वाढल्याने उपचारासाठी मुंबई येथील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून सतत प्रवास सुरू असल्याने मंत्री भुसे यांना हा त्रास जाणवू लागल्याने रविवारी त्यांना मुंबईत दाखल करण्यात आले. तिथे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत ट्वीटरच्या माध्यमातून दादाजी भुसे यांनीच माहिती दिली आहे. ‘माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन’, असे ट्वीट दादाजी भुसे यांनी केले आहे.