जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या ‘विकेल ते पिकेल’ अभियानाचा भाग म्हणून नवनिर्मिती शेतकरी मंडळ, आसोदा यांचे भौगोलिक मानांकन मान्यताप्राप्त भरित वांगी थेट ग्राहकांना उपलब्ध होण्यासाठी सुपरॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी लि. जळगाव यांचे सुपर ॲग्रो शॉपी वर ना. दादाजी भुसे, कृषि मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते सुरुवात करण्यात आली आहे.
याप्रसंगी गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव तथा मंत्री स्वच्छता व पाणीपुरवठा महाराष्ट् राज्य हे उपस्थित होते. ग्राहकांना शेतकऱ्याकडील दर्जेदार शेतमाल रास्त दरात उपलब्ध व्हावा व शेतकऱ्यांनाही मुल्यवाढ मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा उपक्रम सुरु केला. असल्याचे कृषिमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले. सुपर ॲग्रो फार्मर्स प्रोडयूसर कंपनीने सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य असून त्यांचेमार्फत शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच प्रक्रीया उद्योगाबाबत मार्गर्शन व्हावे अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्ती केली. जळगाव जिल्हा केळीचा प्रमुख जिल्हा असून केळीचे उपपदार्थ जसे बिस्किट, पावडर, लाडू इत्यादी शेतकरी व महिला गट उद्योजक म्हणून तयार करीत आहे. यासारखे अनेक उपक्रम जिल्ह्यात आम्ही करु शकतो असे ना. गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले. यासाठी जळगाव शहरात महानगरपालिकेव्दारा विनामुल्य जागा उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री महोदयांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न कंपनी करेल व शेतकऱ्यांना सर्व बाबतीत मार्गदर्शन करुन मुल्यवर्धन व बाजारपेठ उपलब्घ करुन देऊ असे कंपनी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव कृषि उपसंचालक अनिल भोकरे, तसेच शेतकरी, कंपनीचे संचालक मंडळ, शेतकरी गटांचे सदस्य व परिसरातील नागरीक उपस्थित होते.