नवी दिल्ली (वृत्तसंस्था) “अहमद पटेल यांच्या निधनाने मी दु:खी झालोय. अहमद पटेल यांनी त्यांच्या सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्ष समाजाची सेवा केली. काँग्रेसमधील त्यांची भूमिका, पक्षासाठी त्यांचं योगदान काँग्रेस नेहमी स्मरणात ठेवेल. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो”, अशा शब्दात मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार अहमद पटेल यांचं निधन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सार्वजनिक आयुष्यात त्यांनी अनेक वर्ष समाजाची सेवा केली. त्यांच्या तल्लख बुद्धीमत्तेसाठी तसंच पक्षाला बळकटी देण्यासाठी काँग्रेस पक्ष त्यांना नेहमीच स्मरणात ठेवेल, अशा शब्दात मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त त्यांचे सुपूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरु दिलं. साधारण महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांची तब्येत जास्तच खालावली होती. जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते.
फैजल पटेल यांनी दु:खद ट्विट करताना म्हटलंय “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज पहाटे ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी”.