नवी दिल्ली । एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांना दुबईत प्रवेश नाकारण्यात आला आहे. कंपनीने दोन वेळा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, दुबईला एअर इंडियाच्या विमानातून गेलेल्या करोनाग्रस्त प्रवाशांच्या उपचाराचा आणि क्वारंटाइन ठेवण्याचा खर्चही एअर इंडियाला करावा लागणार आहे. दुबईसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसला पुन्हा विमाने सुरू करण्यासाठी, असे प्रकार पुन्हा थांबवण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठीही सांगण्यात आले आहे. ४ सप्टेंबर रोजी जयपूरवरून दुबईला जाणार्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाने प्रवास केला होता. तसेच त्याला त्यापूर्वीच करोनाची लागण झाली होती. परंतु त्यानंतरही कंपनीने त्याला प्रवास करण्यास दिल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं संयुक्त अरब अमिरातीला जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी गेल्या महिन्यापासून करोनाचे चाचणी अहवाल अनिवार्य केले आहेत.