जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीत अजितदादा पवार यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत महायुती प्रणित सहकार पॅनलचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत तर काँग्रेस व शरद पवार गटाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मित्रपक्ष व महायुती मिळून सहकार पॅनल निवडणुकीसाठी तयार केले होते. या पॅनलमध्ये पाच जागांसाठी उमेदवार निवडून येण्यासाठी 3 मार्च रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीची आज मुंबई येथे मतमोजणी घेण्यात आली. या मतमोजणीत सहकार पॅनलचे पाचचे पाच उमेदवार विजयी झालेत. त्यात महिला राखीव मतदार संघातून कोल्हापूर येथील धनश्रीदेवी धनराज घाटगे, धाराशिव येथील अयोध्याताई भागवतराव धस, इतर मागासवर्गीय मतदार संघातून श्रीगोंद्याचे दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, भटक्या विमुक्त मतदार संघातून अशोक सुखदेव हटकर आणि अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा समावेश आहे.
या निवडणुकीची पूर्ण प्रचार यंत्रणा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सांभाळली होती. या निवडणुकीत महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री अब्दुलभाई सत्तार तसेच जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन आमदार मंगेशदादा चव्हाण, आमदार राजेंद्र शिंगणे, महाराष्ट्र राज्य हाउसिंग कार्पोरेशनचे चेअरमन वसंतराव भुई खेडकर, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष भागवतराव धस, कोल्हापूर येथील गोकुळ दूध उत्पादक सहकारी संस्थेचे माजी चेअरमन अरुण नरके, माजी आमदार संजय बाबा घाटगे, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या माजी उपाध्यक्ष शैलजादेवी दिलीप निकम, औरंगाबादचे आमदार सतीशदादा चव्हाण, आमदार विक्रम काळे, कन्नडचे माजी आमदार नितीनदादा पाटील, अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन अभिजीत ढेपे, कोकण विभागाचे मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक मोहन अंधेरे, मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक शामरावजी काकडे, नगर जिल्ह्याचे माजी आमदार बिपिनदादा कोल्हे, औरंगाबाद येथील हाऊसिंग कार्पोरेशनचे संचालक संजय जाधव, माजी आमदार नरेश ठाकरे या निवडणुकीसाठी मदत केली होती. या मान्यवरांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. तसेच या निवडणुकीसाठी अजितदादा पवार यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन संजय मुरलीधर पवार यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांशी समन्वय साधून नियोजन करण्याची जबाबदारी दिलेली होती.