नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात कोरोना लसीकरणाची सुरुवात झाली आहे. कोरोना लस घेण्याआधी आणि नंतर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. याच सावधगिरी बाळगण्यामध्ये एक मद्यपान आहे. मद्यपानाचा रोगप्रतिकारशक्ती अर्थात इम्यूनिटीवर वाईट परिणाम होतो. यामुळे रोगाशी लढण्याची क्षमता कमजोर होते. कोरोना लस इम्यूनिटीवरच काम करते. त्यामुळे लस घेण्याआधी आणि लस घेतल्याच्या काही दिवसांनंतरही मद्यपान न करण्याचं जगभरातील एक्सपर्ट्सन इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील पहिल्या टप्प्यातील कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात केली. जगभरातील जाणकारांनी वॅक्सिनेशनच्या आधी आणि वॅक्सिनेशनच्या नंतर मद्यपान केल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या येऊ शकतात, असं म्हटलं आहे. लसीकरणाच्या किती वेळ आधी आणि किती वेळ नंतर मद्यपान करू नये, याबाबत अनेक एक्सपर्ट्सचं वेगवेगळं मत आहे. रशियाच्या हेल्थ एक्सपर्ट्सचं असं म्हणणं आहे की, स्पुतनिकची लस घेण्याआधी दोन आठवडे आणि लस घेतल्यानंतर सहा आठवड्यांपर्यंत मद्यपान करू नये. तर, हे वॅक्सिन बनवणारे डॉक्टर अलेक्जेंडर गिन्टबर्ग यांनी, लस घेण्याआधी आणि नंतर तीन दिवसांपर्यंत मद्यपान न करण्याचं सांगितलं आहे. ब्रिटनच्या हेल्थ एक्सपर्ट्सनी, लस घेण्याच्या एक दिवस आधी आणि लस घेतल्यानंतर एक दिवसापर्यंत मद्यपान करू नये असं सांगितलं आहे.