अकोला (वृत्तसंस्था) दिवसभर लग्नसमारंभात हजेरी लावल्यानंतर सायंकाळी घरी परत आल्यावर अचानक तब्येत खराब होत, एका तरुणाचा झोपेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बार्शीटाकळी तालुक्यातील रेडवा येथे घडली. उमेश मोहन पवार (वय २६) असे मयत तरुणाचे नाव आहे. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
रविवार, १४ मे रोजी रेडवा येथे एक विवाह सोहळा होता. या लग्नात उमेश पवार हा दिवसभर लग्नसमारंभात हजर होता. घरी आल्यानंतर रात्री त्याने जेवण केले. जेवण करून झोपल्यानंतर त्याला त्रास सुरु झाला. त्यामुळे गावातीलच डॉक्टरकडे नेण्यात आले. डॉक्टरांनी रक्तदाब कमी झाल्याचे सांगत उष्माघातामुळे त्रास होत असल्याचे सांगितले. घरी परत आल्यानंतर उमेश शांत झोपला. परंतू तो नंतर उठलाच नाही. झोपेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी तापमान ४५ अंशांवर असल्याने उमेश पवार याला उन्हाचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर याच गावातील दुसरा युवक विनेश तुकाराम पवार (वय २६) याचा देखील मृत्यू २४ एप्रिल रोजी उष्माघाताने झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त आज एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.