पिंपरी-चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. बनसोडे यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र सुदैवाने एकही गोळी त्यांना लागली नाही.
पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. तान्हाजी पवार असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पिस्तुलातून आमदार बनसोडे यांच्या दिशेनं गोळी झाडली. या गोळीबारात बनसोडे हे सुदैवाने बचावले असून, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.
हा सर्व प्रकार दुपारी दुपारी दीडच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी आरोपी तान्हाजी पवार याला पिंपरी पोलिसांनी अटक केली असून, गोळीबाराचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. ‘याप्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करतील’, असे आमदार अण्णा बनसोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
हल्ला झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना म्हटलं की, ठेकेदार अँथोनी यांचा सुपरवायझर तान्हाजी पवारला गेल्या काही दिवसांपासून आम्ही संपर्क करत होतो. दोन मुलांना कामाला लावण्यासंदर्भात मी संपर्क करत होतो. माझ्या पीएने तान्हाजी पवारला फोन केला होता. मात्र त्याने बोलताना अरेरावी केली. त्यामुळे मी त्याला बोलावून घेतलं होतं. त्याला समजावून सांगितलं. मात्र त्याने बाहेर जाऊन थेट गोळीबार केला. आमच्या काही वादावादी झाली नाही, मात्र पवारने वाद घातला. तान्हाजी पवारने गोळीबार केल्यानंतर इथे उपस्थित असलेल्या मुलाने त्याला खाली पाडलं.