भुसावळ (प्रतिनिधी) राज्य परिवहन महामंडळ शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात रावेर भुसावळ आगारातील सर्व रा.प. कर्मचारी देखील काल मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहे. तसेच याबाबतचे निवेदन भुसावळ आगार प्रमुख प्रमोद चौधरी यांना देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगारातील सर्व रा.प. कर्मचारी यांनी निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रभर रा.प. महामंडळाच्या अन्यायस्पद धोरणांमुळे कामगारांच्या दिवसेंदिवस होत असलेल्या आत्महत्यामुळे भुसावळ आगारातील कर्मचारी सुद्धा दि. ०७-११-२०२१ च्या मध्यरात्री पासून बेमुदत संपात सहभागी होत आहे. रा.प. कर्मचाऱ्यांची मागणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीन करण्याची तयारीत आहे. राज्य परिवहन महामंडळ व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत विलीनीकरण होण्याची मागणी पूर्णत्वास नेण्यासाठी शांततेत व संवेदनशील मार्गाने बेमुदत संप पुकारले आहे. या ठिकाणी कोणत्याही संघटनेचा संबंध नसून एक कर्मचारी म्हणून सर्व रा. प. कर्मचारी संपात सहभागी होत आहे. याबाबत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सर्व भुसावळ आगारातील रा.प. कर्मचाऱ्यामार्फत निवेदन देण्यात आले.
याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव, विभागीय नियंत्रक रा.प. जळगाव, तहसीलदार भुसावळ, पोलिस निरीक्षक बाजारपेठ पोलिस स्टेशन, आमदार संजय सावकारे निवेदनाची प्रत पाठविण्यात आलेली आहे