जळगाव (प्रतिनिधी) नशिराबाद येथील ग्रामपंचायतीच्या जागी नगपरिषद स्थापन करण्यात येईल असे अभिवचन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले होते. त्यांनी याबाबतचा पाठपुरावा केल्याने दोन दिवसांपूर्वीच नशिराबाद येथील नगरपरिषदेची अधिसूचना निघाली आहे. पालकमंत्र्यांनी आपला शब्द पाळला म्हणून आज नशिराबाद येथे त्यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला.
नशिराबाद हे तालुक्यातील मोठे गाव असून नगरपरिषदेच्या माध्यमातून याच्या विकासाला गती येणार असून येथील समग्र विकासासाठी आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
याप्रसंगी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा हृद्य सत्कार केला. याला उत्तर देतांना ना. पाटील यांनी गावाच्या विकासात राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्रपणे काम करण्याचे आवाहन केले. शहराच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही देखील ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, सरपंच विकास पाटील, उपसरपंच कीर्ती चौबे, माजी सरपंच पंकज महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकास धनगर, शिवसेना युवा प्रमुख चेतन बऱ्हाटे, राष्ट्रवादी शहर चिटणीस प्रा. विश्वनाथ महाजन, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष बरकत अली, मनसे तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे आदी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.