जळगाव (प्रतिनिधी) मुलाला दुचाकी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत संबंधितांवर कारवाई करण्यासह पाच लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह पाच कर्मचान्यांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावली आहे. या प्रकरणी १३ जुलै २०२३ रोजी आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.
मूळ नाचणखेडा, ता. जामनेर येथील रहिवासी असलेल्या यमुनाबाई दत्तू पाटील या सध्या शिवकॉलनीत राहतात. त्यांचा मुलगा नितीन हा पुणे येथे कंपनीत कामाला असताना त्याला दुचाकी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केल्याचे यमुनाबाई यांचे म्हणणे आहे. त्यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र काहीही कार्यवाही न झाल्याने २९ मे २०२१ रोजी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. कर्मचाऱ्यांवर कारवाई पोलिस होत नसल्याने यमुनाबाई यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. त्यात संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व पाच लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
दरम्यान, एलसीबीच्या दोन कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी येऊन मुलगा नितीनविषयी विचारपूस केली. तो पुण्याला कंपनीत असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी त्याचा मोबाइल क्रमांक घेत निघून गेले. त्यानंतर १८ मे २०२१ रोजी त्यांनी पुणे येथून नितीनला ताब्यात घेतले व त्याला जळगाव येथे एलसीबी कार्यालयात आणून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. याबाबतचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिले आहे.