जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट अगदी कमी होत आहे. त्यामुळे एमएस-सीआयटी हा शासनमान्य अभ्यासक्रम व घङळउ सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम आता सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील संगणक संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात एमकेसीएलची १५२ अधिकृत केंद्र आहेत. केंद्रातून येणा-या उत्पन्नातून लाइट बिल, इंटरनेट बिल, मनपा कर, शिक्षकांचा पगार अथवा मानधन आदी दैनंदिन खर्च होत असतो. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवहार थकले आहेत. केंद्रांमध्ये 70 टक्के अधिक प्रवेश उन्हाळ्याच्या मुद्रित म्हणजेच मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यात होतात. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर हजारो विद्यार्थी एमएससीआयटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी तसेच निमशासकीय व खासगी क्षेत्रात कामासाठी लाभदायी आहे. परंतु, प्रदीर्घ काळापासून प्रवेश बंद आहे. अभ्यास केंद्रे किती महिने आणखी बंद राहील, हाही एक प्रश्न आहे. केंद्रांमध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जास्त काळ बंद राहिल्यास निकामी होण्याचा धोका आहे, असे झाल्यास केंद्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसेल. त्यामुळे ही केंद्रे सुरू करण्यासाठी फिजिकल डिस्टन्स व इतर नियम पाळण्याची हमी ही नमूद केलेली आहे.
निवेदन देताना संगणक संस्थाचालक उमाकांत बडगुजर, प्रवीण जाधव, महेंद्र बारी, दिग्विजय तिवारी, अभिजीत थोरात, योगेश पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.