जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध पैशांची वाहतुक रोखण्यासाठी शहरातील विविध भागात नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. शहरातील शनिपेठ, शहर व रामानंद नगर पोलिसांनी कारवाई करीत २३ लाख ३० हजार जप्त करण्यात असून ती रोकड एफएसटी पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून शहरातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पैशांची वाहतुक केली जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आपल्या हद्दीत नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी शहरततील कोंबडी मार्केट परिसरात नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी पोलिसांना एका वाहनात ७७ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोहेकों विजय खैरे, योगेश माळी, किरण वानखेडे, विक्की इंगळे, यांचे पथक तपासणी करीत होते. या पथकाने त्याठिकाणाहून जाणाऱ्या (एमएच १८, बीसी ५९८३) क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. यावेळी त्यांना वाहनात एका पिशवीत ६ लाखांची रोकड मिळून आली.
रेमण्ड चौकासह मोहाडी रस्त्यावर कारवाई
छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या वाहनाची एमआयडीसी पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये रेमण्ड चौकात २ लाख ९० हजार रुपये तर मोहाडी रस्त्यावर विशेष पथकाला एका कारमध्ये ४ लाख रुपयांची रोकड मिळून आली. तसेच जिल्हापेठ पोलीसांकडून करण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये बी. जे. मार्केट परिसरात एका व्यापाऱ्याकडे ९५ हजार ५०० रुपये मिळून आले. पोलिसांनी ही रोकड जप्त केली आहे. शुक्रवारी दिवसभरात जळगाव विभागात केलेल्या नाकाबंदीत २३ लाख ३० हजार रुपयांची रोकड मिळून आली.
जामनेरात सव्वा सतरा लाखांची रोकड हस्तगत !
जामनेर तालुक्यातील पहूरकडून जामनेरकडे येणाऱ्या एका चारचाकी वाहनातून जवळपास १७ लाख २४ हजारांची रोख रक्कम नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी जप्त केली आहे. ही रक्कम गुजरातमध्ये कापूस विकल्यानंतर आणली जात असल्याचे सांगण्यात आले. शहरातील पहूर रोडवरील तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर वाहनांची तपासणी करीत असताना चारचाकी (एमएच – १६, ऐजे- ४५८५) या वाहनातून १७ लाख २४ हजार ८०० रूपयांची रोख रक्कम १५ रोजी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास हस्तगत करण्यात आली. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील नवाब अकबर पठाण व जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथील प्रकाश रामधन पाटील हे गुजरात राज्यात कापूस विकून ही रोख रक्कम घेऊन चारचाकी वाहनातून पहूरकडून जामनेर येथे येत होते. त्यादरम्यान पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड, पथक प्रमुख अनंत वंजारी यांच्या पथकाने तपासणी केली असता ही रोकड मिळाली आहे. ही सर्व रक्कम पोलीस संरक्षणात जळगाव येथे पाठवण्यात आली आहे.
आकाशवाणी चौकात पकडली लाख २० हजारांची रोकड !
शहरातील आकाशवाणी चौकात रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल पाटील, पोहेकॉ संजय सपकाळे, इरफान मलिक, जितेंद्र राठोड, जितेंद्र राजपूत व महिला पोहेकॉ उषा सोनवणे यांचे पथक नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत होते. तपासणी करीत असतांना ईच्छादेवी चौफुलीकडून आकाशवाणीकडे येणाऱ्या (एमएच २०, ईई ८८०८) क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. यामध्ये पोलिसांना ६ लाख १९ हजार ७०० रुपयांची रोकड मिळून आली. ती रोकड भावेश संतोषकुमार मतानी (रा. टीएमनगर) यांची असून ते कपड्याचे व्यापारी आहे. दुकानावर जात असतांना पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. ती रोकड पुढील तपासणीसाठी भरारी पथकाकडे सोपविण्यात आली.