अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर शहरात बनावट गावठी पिस्तूल व्यापार करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी अमळनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, अमळनेर-चोपडा रोडवर एक इसम गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेळीच कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून दोन गावठी पिस्तुलं, सहा जिवंत काडतुसे व दोन मोटारसायकलीसह एकूण रु. 1,66,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीवरून कारवाई
गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हे अन्वेषण पथक तयार केले. या पथकात पो.उप.नि. नामदेव आनंदा बोरकर, पो.ह.क्र. 1998 मिलिंद अशोक सोनार, पो.शि.क्र. 1870 उदय राजेंद्र बोरसे आणि पो.शि.क्र.1311 निलेश सुभाष मोरे यांचा समावेश होता. हे पथक खाजगी वाहनाने अमळनेर-चोपडा रोड परिसरात पोहोचले. रात्री सुमारे 22.30 वाजता संत आसाराम बापू आश्रमाजवळ पोलिसांनी संशयित इसमांचा शोध घेतला असता दोन इसम पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले.
अटक केलेले आरोपी आणि जप्त मुद्देमाल
अटक केलेल्या आरोपींची नावे विशाल भैय्या सोनवणे (वय 18, रा. ढेकुसिम, ता. अमळनेर) आणि गोपाल भिमा भिल (वय 30, रा. सत्रासेन, ता. चोपडा, जि. जळगाव) अशी आहेत. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून दोन गावठी बनावटीच्या पिस्तुलं, सहा जिवंत काडतुसे आणि दोन मोटारसायकली मिळून आल्या. चौकशीदरम्यान पोलिसांनी शस्त्र परवाना विचारला असता, आरोपींकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रु. 1,66,000 असून त्यामध्ये दोन गावठी पिस्तुलं (किंमत रु. 60,000), सहा जिवंत काडतुसे (किंमत रु. 6,000) आणि दोन मोटारसायकली (किंमत रु. 1,00,000) यांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
अमळनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 0352/2025 नोंदविण्यात आला असून आरोपींवर शस्त्र अधिनियम कलम 3, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. सरकार तर्फे फिर्यादी म्हणून पो.शि.क्र. 2826 विनोद किरण संदानशिव यांनी तक्रार नोंदविली असून या प्रकरणाचा पुढील तपास पो.उप.नि. नामदेव आनंदा बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक सौ. कविता नेरकर, चाळीसगाव परिमंडळ तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने केली आहे.
गणेशोत्सव व ईद ऐ मिलादपूर्वी पोलिसांची सतर्कता
सध्या अमळनेर शहरात गणेशोत्सव, आगामी ईद ऐ मिलाद व इतर सण उत्सवाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात तलवारी, पिस्तुलं, प्राणघातक शस्त्रास्त्रं घेऊन जमावात सामील होण्यास प्रतिबंध आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणतीही व्यक्ती बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्रं किंवा प्राणघातक शस्त्रं बाळगत असल्याची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी. बातमीदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.