अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील डांगर बु. येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही घटना २९ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली. आकाश राजेंद्र भिल असे मृत बालकाचे नाव आहे. हृदयद्रावक म्हणजे बालकाला दोन ठिकाणी वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.
इयत्ता चौथीत शिकणारा आकाश हा जिल्हा परिषदेच्या शाळेत जाताना त्यास सर्पदंश झाला. याची माहिती मिळताच आकाशला सुरुवातीला जानवे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात नेले होते. परंतु, तेथेही त्याच्यावर तात्पुरते उपचार करण्यात आले. नंतर त्याला गंभीर अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. धुळे येथील डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले. दरम्यान स्थानिक शासकीय आरोग्य यंत्रणा सुसज्ज राहिली असती, तर आकाशवर तातडीने उपचार होऊन त्याचे प्राण वाचले असते अशी खंत मृत आकाशचे काकांनी व्यक्त केली.