अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नीम गावात उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. चेतन धनराज पवार (९) आणि मयुर उर्फ हरीश बाळू पाटील (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत.
सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास दोघेही गावालगतच्या तापी नदीवर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, दुपारी चार वाजेपर्यंत ते घरी परतले नसल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. संध्याकाळी सहाच्या सुमारास गावातील गुराख्यांना नदीच्या काठावर दगडाखाली ठेवलेले कपडे आढळले. नातेवाईकांनी ते कपडे ओळखल्यानंतर नदीत बुडण्याची शंका बळावली.
तत्काळ शोधमोहीम राबवण्यात आली. रात्री चेतनचा मृतदेह सापडला, तर मयुरचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मयूरचे वडील शेतमजूर असून त्याला एक बहीण आहे. चेतनचे वडील मयत असून तो आजोबांकडे राहत होता. त्यालाही एक बहीण आहे. या अपघाती मृत्युमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण नीम गावात शोककळा पसरली आहे.
घटनेचा पंचनामा मारवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, फिरोज बागवान, संजय पाटील आणि अगोने यांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.