मुंबई (वृत्तसंस्था) “अमित शाह आणि भाजपची वाटचाल” या मुळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी फडणवीसांनी गृहमंत्री अमित शाह यांचं तोंडभरून कौतुक केलं. अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा सखोल अभ्यास केल्याचं आणि त्यावर एक पुस्तक लिहिल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्राचा अतिशय सखोल अभ्यास केला आहे. अनेक तास ते यावर बोलू शकतात. त्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे. देश-विदेशातून त्यासाठी त्यांनी संदर्भ गोळा केले. या पुस्तकाचे प्रकाशन अजून व्हायचे आहे. अमित शाह यांचे व्यक्तिमत्त्व कुटुंब वत्सल आणि संवेदनशील असे आहे. आपल्या नातीशी दिवसभरातील व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते दररोज बोलत असतात. अमित शाह यांची निर्णय क्षमता अतिशय मोठी आहे. स्वतः दौरे करून अभ्यास करायचा आणि निर्णय घ्यायचा, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी काश्मिरच्या ३७० चा निर्णय शक्य करून दाखविला. अमित शाह यांच्या व्यक्तिमत्वाचे मेहनत, त्याग आणि प्रखर राष्ट्रवाद असे अनेक पैलू आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते ‘गधाधारी’ दिसते
भाषण नाही, तर कृतीत आणून दाखविणारे फार कमी नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे त्यातील आपले नेते आहेत. आजकाल ‘गदाधारी’ हिंदुत्वाच्या गप्पा मारल्या जातात, पण रोज सकाळी टीव्ही पाहिला की ते ‘गधाधारी’ दिसते,” असंही त्यांनी नमूद केलं. फडणवीस पुढे म्हणाले, “‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या पुस्तकातून अमित शाह यांचा संपूर्ण जीवनपट साकारण्यात आला आहे. भाजपाची वाटचाल आणि त्यात अमित शाह पर्व याचा संपूर्ण मागोवा त्यात आला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडण्याचा, सोपे करून सांगण्याचे काम लेखकांनी केले आहे.”