मुंबई (वृत्तसंस्था) अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गणेश वंदना या नावाने हा व्हिडीओ लाँच करण्यात आला आहे.
अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गणेश वंदनेचा व्हिडीओ रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस पुन्हा एकदा पारंपरिक मराठमोळ्या वेशभुषेत पाहायला मिळत आहेत. टाइम्स म्युझिक हब कंपनीच्या माध्यामातून हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या व्हीडिओसाठी मी खूप उत्सुक होते. हा व्हीडिओ जसा मला कनेक्ट झाला आहे, तसा तुम्हालाही होईल, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी व्यक्त केली.
‘गणेश वंदना’ या ४ मिनिटे ४९ सेकंदाच्या गाण्यात अमृता यांनी एका कुटुंबातील स्त्रीची भूमिका साकारली आहे. ती स्त्री एक डॉक्टर आहे. या स्त्रीच्या कुटुंबात लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु असते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहात बाप्पाचे स्वागत करत असतात. एककीडे घरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते तर दुसरीकडे त्या स्त्रीला डॉक्टर असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये तातडीने बोलवण्यात येते. ती स्त्री घरातील जबाबदारी पार पाडून आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज होते. तिच्या कुटुंबातील लोकांचाही तिला यासाठी पाठिंबा असल्याचे गाण्यात दाखवण्यात आले आहे.