चोपडा दि.२०(प्रतिनिधी)चोपडा विधानसभा निवडणूक 2024 साठी बुधगाव केंद्रावर नियुक्ती असलेले बीएलओ लक्ष्मीकांत वासुदेव पाटील हे मतदान प्रक्रिया पूर्ण करून घरी जात असतानासमोरुन येणाऱ्या मोटरसायकलने जोरदार टक्कर दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली.याबत उशिरापर्यंत निवडणूक विभागाला घटनेचा थांगपत्ता नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
सकाळी सात वाजेपासून निवडणूकीसाठी बुधगाव केंद्रावर बीएलओ म्हणून लक्ष्मीकांत वासुदेव पाटील( वय४९) रा. बबडाज, तालुका शिरपूर, हे ड्युटीवर हजर होते .दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी घर वापसी करताना ते गलंगी गावाजवळून जात असतांना सपना हॉटेल जवळ समोरून येणाऱ्या भरधाव मोटार सायकलने यांच्या मोटरसायकलला जोरदार टक्कर दिल्याने ते जागी पडून डोक्याला जबर मार लागून गतप्राण झाले. अपघातातील मोटारसायकलवर आदिवासी कुटुंब असल्याचे समजते. त्यानंतर पुढील कारवाईसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आला आहे.
मयत लक्ष्मीकांत पाटील यांच्या पश्चात मुलगा “स्वरूप” हा चंदिगड येथे बीई चे शिक्षण घेत आहे तर मुलगी “सोनू” ही एमबीबीएसचे शिक्षण फिलिपाईन्स येथे घेत असल्याने ते उद्या चोपड्यात आल्यानंतर शवविच्छेदन प्रक्रिया होण्याची शक्यता आहे .या ह्रदय द्रावक घटनेने प्राथमिक शिक्षकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली दुःख व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत रात्री उशिरापर्यंत निवडणूक शाखेत ग. स .संचालक योगेश सनेर यांनी माहिती दिल्याचे समजते. चोपडा येथे मतदान शांततेत झाले मात्र या प्रक्रियेच्या भाग असलेला एक कर्मचारी गतप्राण झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.