जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे . डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था( आर्टी) कंपनी नोंदणी कायदा 2013 अंतर्गत नियम 8 नुसार स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या बाबतचा सामाजिक न्याय विभागाचा दिनांक 16 जुलै 2024 शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
शासनाने सन 2003 मध्ये क्रांतीगुरू लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठीत केला होता. या आयोगाने शासनास 82 शिफारशी केलेल्या असून 72 क्रमांकावर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मुंबई येथे राष्ट्रीय स्मारक उभे करून त्यात संशोधन व ज्ञानार्जन यांच्या अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी शिफारस केलेली होती.तसेच सन 2024-25 च्या आंतरिम अर्थसंकल्पामध्ये बार्टी च्या धरतीवर मातंग समाजासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)स्थापन करण्यात येणार आहे अशी घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती (मांग, मातंग, मिनीमादीग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारुडी, राधेमांग, मांग- गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा) या समाजाच्या विकासाकरिता आर्टी संस्था स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
या संस्थेकरीता व्यवस्थापकीय संचालक व निबंधक अशा दोन पदांना देखील मान्यता देण्यात आली आहे. सदर संस्थेअंतर्गत संशोधन विभाग, प्रशिक्षण विभाग, योजना विभाग, विस्तार व सेवा विभाग, लेखा विभाग आस्थापना विभाग हे कार्यरत असतील. या संस्थेचे कामकाज सद्यस्थितीत भाड्याच्या इमारतीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. चिरागनगर, घाटकोपर, मुंबई येथील अण्णा भाऊ साठे यांचे राष्ट्रीय स्मारक पूर्ण झाल्यानंतर स्मारकाच्या इमारतीतून संस्थेचे कामकाज चालेल. तसेच संस्थेला आवश्यक मनुष्यबळ हे सेवा करार पद्धतीने बाह्य यंत्रणेद्वारे तसेच अतिरिक्त पदभार देऊन उपलब्ध करून घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण,उच्चशिक्षण , प्रशिक्षण , संशोधन , कौशल्य विकास , रोजगार व रोजगार प्रशिक्षण , स्टार्टअप, रोजगार निर्मिती, प्रचार , प्रसिद्धी , प्रसार , सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास करण्यासाठी व त्यांच्याशी निगडित विविध योजना राबविण्यात येणार आहे तसेच परंपरागत व्यवसायांना चालना देणे आर्थिक मदत करणे हे देखील उद्दिष्टे निश्चित करण्यात आले आहेत.
शासनाने शब्द पाळला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे !
शासनाने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या नावे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा शब्द दिला होता, तो शब्द शासनाने पूर्ण केला असून समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.स्थापन करण्यात आलेल्या आर्टी संस्थेला निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही,आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे समाजकल्याण विभागाकडून सांगण्यात आले.