मुक्ताईनगर (प्रतिनिधी) बऱ्हाणपूर जिल्ह्यातील फोपनार येथून परत येत असताना खामखेडा पुलाजवळ दुचाकीस अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार झाल्याची घटना दि. २३ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. यात सुभाष रामराव घोडकी (वय ४१) आणि सोनुबाई सुभाष घोडकी (वय ३४, रा. निमखेडी, ता. मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला.
मुक्ताईनगरला लागून असलेल्या खामखेडा पुलाजवळ हा अपघात झाला. घोडकी दाम्पत्य हे दुचाकी (क्रमांक एम.एच १९ ईएफ ९२११) ने परतत होते. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दोघेही फेकले गेले आणि जागीच ठार झाले. दुसरा वाहनचालक फरार झाला आहे. यात मयताचा पुतण्या प्रवीण घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडकी यांच्या पश्चात आई आणि दोन मुले आहेत.