जळगाव (प्रतिनिधी) काही दिवसांपूर्वी भजे गल्लीमध्ये दारू पिऊन वाद घालणाऱ्या तरुणांना जिल्हापेठ पोलिसांनी पोलिस ठाण्यात नेले होते. याचा राग मनात ठेवून त्या तरुणांनी मित्रांसोबत जेवण्यासाठी हॉटेलात आलेल्या गणेश मधुकर पाटील (३८) या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फायटरने वार केल्याची घटना हॉटेल रिगल पॅलेसमध्ये मंगळवारी रात्री घडली.
नेमकं काय घडलं
याप्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून एक संशयित अद्याप फरार आहे. पोलिस गणेश पाटील हे जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कार्यरत असून ते मंगळवारी रात्री त्यांचे मित्र मयूर गवळी व सीताराम पुरोहित यांच्यासोबत जेवणासाठी हॉटेल रिगल येथे गेले होते. समोरील टेबलावर बसलेले दोन जण त्यांच्याजवळ आले. त्यातील एकाने तुम्ही पोलिस गाडीत आम्हाला पोलिस ठाण्यात घेऊन गेले होते, असे त्यांनी सांगितल्यावर पाटील यांनी त्यांना ओळखले. काही वेळानंतर त्या तरुणांनी शेजारच्या टेबलावर बसलेल्या समाधान बारी व परवेज शेख यांना पाण्याची बाटली मारून फेकली व शिवीगाळ, दमदाटी केली.
लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फायटरने हल्ला !
चौघे तरुण वाद घालत असल्याने गणेश पाटील हे त्यांना समजावत असताना त्यांनी तू कोण रे, तुझा काय संबंध आहे येथे, तू यापूर्वी मला पोलिस स्टेशनला घेऊन गेला होता. तेव्हापासून तू माझ्या डोक्यात बसला आहे. आता तू चांगलाच सापडला आहे, आता माझे मित्र सुद्धा आहेत, तू काही करू शकणार नाही, असे म्हणत वाद घालणाऱ्या तरुणांपैकी एकाने खिशातून फायटर काढून पाटील यांच्या चेहऱ्यावर मारून त्यांना गंभीर दुखापत केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या तिघांनी त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून केली.
तिघांना अटक, चौघांविरुद्ध गुन्हा !
सोबत असलेल्या लोकांनी गणेश पाटील यांची मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांनी घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना दिल्यानंतर लागलीच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी संशयित कृष्णा नरेंद्र पिंगळे (२०, रा. रायसोनी नगर, जिजाऊ चौक), मयंक राजेंद्र चौधरी (२७. रा. गणेशवाडी), भावेश अनिल चौधरी (१९, रा. गणेश वाडी) यांना अटक केली तर त्यांच्यासोबत असलेला गोपाल नवल हा तेथून पसार झाला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.