मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष कोर्टाने देशमुख यांना ही कोठडी सुनावली आहे.
अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवण्यात आले. देशमुख यांना शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने त्यांच्या कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने नकार देत देशमुख यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे या सुनावणीदरम्यान पत्रकारांना न्यायालयात प्रवेश देण्यात आला नव्हता. सुनावणी आधीच न्यायालयानं पत्रकारांनी मुख्य प्रवेशाच्या बाहेरच थांबावे असे निर्देश दिले होते.
ऋषिकेश देशमुखांना ईडीचं समन्स
अनिल देशमुख यांच्यानंतर मुंबईतील ईडी कार्यालयात ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. ईडीचे अधिकारी ऋषिकेश देशमुख यांची कसून चौकशी करतील, अशी शक्यता होती. दरम्यान ऋषिकेश देशमुख गुरुवारी ईडीसमोर हजर झाले नाहीत. तर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे गंभीर आरोप केले. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.