मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या घरांवर आज ईडीनं सकाळी छापा टाकला. ईडीच्या पथकाने मुंबईत अनिल देशमुखांच्या निवासस्थानी सात तासांहून अधिक काळ चौकशी केली. या कारवाई संदर्भात अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य केलं. यापुढेही ईडीला चौकशीत सहकार्य करत राहणार आहे अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान, यावेळी बोलताना अनिल देशमुख यांनी परमबीर सिंग यांची भूमिका आपल्याला नेमकी संशयास्पद का वाटली, याविषयी देखील भाष्य केलं आहे. “परमबीर सिंग आयुक्त असताना प्रामुख्याने मुकेश अंबांनींच्या घरासमोर जिलेटिन ठेवण्यात आलं. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली. त्यात एपीआय सचिन वाझे, रियाजुद्दीन काझी, विनायक शिंदे, प्रकाश धुमाळ, सुनील माने असे पाच पोलीस हे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये सीआययू विभागात कामाला होते. ते सगळे परमबीर सिंग यांना रिपोर्ट करत होते. शासनाला माहिती मिळाली की हे सगळे या प्रकरणात गुंतले आहेत, तेव्हा परमबीर सिंग यांची आयुक्त म्हणून भूमिका संशयास्पद होती”, असं देशमुख यावेळी म्हणाले.
“अंबानींच्या घराबाहेरची स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. हे अधिकारी तुरुंगात आहेत. अशा संशयास्पद भूमिकेमुळेच त्यांची बदली केली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. सीबीआय नियमानुसार त्याची चौकशी करत आहे. त्यातून सत्य जनतेसमोर येईलच. सीबीआय, ईडीला माझ्याकडून संपूर्ण सहकार्य राहील”, असं अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
४ कोटी रुपये हप्ता दिला, बार मालकांची कबुली
एकीकडे ईडीकडून अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सकाळपासून छापेमारी सुरु आहे. तर दुसरीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील काही बार मालकांचेही जबाब नोंदवल्याचं कळतंय. सुमारे १० ते १२ बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात या बार मालकांनी मिळून काही महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे. त्याच अनुषंगाने आता ईडीची कारवाई सुरु असल्याचं कळंतय.