लातूर (वृत्तसंस्था) महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र संयुक्त सेवा परीक्षा २०२२चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेत लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाची विद्यार्थिनी अनिशा दयानंद आगरकर ही मुलींमधून राज्यात सर्वप्रथम आली आहे.
अनिशा आगरकर ही राजर्षी शाहू महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिचे बी.ए. स्पर्धा परीक्षा विभागात पदवीचे शिक्षण झाले आहे. २०२२ मध्ये झालेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त सेवा परीक्षा तिने दिली होती. पूर्वपरीक्षा, परीक्षा व मुलाखत या तिन्ही टप्प्यांवर ती यशस्वी झाली असून १ ऑगस्ट २०२४ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या निकालात अनिशा आगरकर ही मुलींमधून राज्यात सर्वप्रथम आल्याचे राजर्षी शाहू महाविद्यालयाने प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. या यशाबद्दल प्राचार्य महादेव गव्हाणे, उपप्राचार्य सदाशिव शिंदे, समन्वयक डॉ. अभिजीत यादव व स्पर्धा परीक्षा समन्वयक प्रा. माधव शेळके व इतर प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसह सर्वांकडून अनिशाचे अभिनंदन होत आहे.
















