पाटणा (वृत्तसंस्था) बिहार पोलिसांचा एक व्हिडिओ (Bihar Police Shocking Video) समोर आला आहे. बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील नवहट्टा ब्लॉक अंतर्गत एक पोलिस अधिकारी एका महिलेकडून मॉलिश करून घेत आहे. ही महिला गरजू असून तिच्या मुलाच्या जामिनासाठी ती पोलिसांत आली होती.
शशीभूषण सिंह, असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. महिला आपल्या मुलाच्या सुटकेसाठी आली असता तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत शरीराला मॉलिश करून मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. व्हिडिओमध्ये देखील तेच दिसतेय. पोलिस अधिकारी आणि महिलेच्या संभाषणावरून दिसतेय, की महिला अडचणीत असून पोलिस अधिकारी काम करण्याच्या मोबदल्यात तिच्याकडून मॉलिश करून घेत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पिवळी साडी घातलेली एक महिला मसाज करत आहे तर गेरू रंगाची साडी घातलेली दुसरी महिला तिच्या समोर बसली आहे. एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करून व्हायरल केला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक लिपी सिंह यांनी पोलिस अधिकारी शशीभूषण सिंह यांना निलंबित केले आहे.
“ती महिला गरजू आणि गरीब आहे. मी किती पैसे पाठवायचे? आम्ही ते एका लिफाफ्यात पाठवू. दोन महिला त्यांचे आधारकार्ड घेऊन तुमच्याकडे येतील. मी त्यांना सोमवारी पत्ता आणि मोबाईल नंबर घेऊन पाठवीन. पप्पू बाबू, मी तुम्हाला विनंती करतो. मी आधीच 10,000 रुपये खर्च केले आहेत,” असे पोलिस अधिकारी शशीभूषण सिन्हा वकिलासोबत बोलताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.