सातारा (वृत्तसंस्था) कर्जवसुलीसाठी खासगी सावकाराने चक्क दीड महिन्यांच्या चिमुकलीलाच घरातून घेऊन गेल्याची घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून ताब्यात ठेवलेले बाळ परत करायला हा सावकार तयार नसल्याचा आरोप बाळाच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ तपास करुन बाळाचा सुखरुप ताबा घेऊन ते आईकडे सुपूर्द केले आहे.
सातारा येथील मंगळवार पेठेतील ढोणे कॉलनीत राहणाऱ्या अभिषेक कुचेकर या युवकाने संजय बाबर व अश्विनी पवार बाबर या दांपत्याकडून गतवर्षी ३० हजार रुपये कर्जाऊ घेतले होते. त्यानंतर एक वर्षात अभिषेकने दांपत्याला ६० हजार रुपये परतही केले. एका वर्षात दुपटी, चौपटीने व्याज वसूल करूनदेखील दांपत्याची पैशाची भूक थांबली नाही. ते सातत्याने आणखी पैशांची मागणी यांच्याकडे करतच होते. चार ते पाच महिन्यांपूर्वी अभिषेक यांची दीड महिन्याची मुलगीच बाबर दांपत्याने घरात येऊन उचलून नेली. मुलीला परत आणण्यासाठी अभिषेक संजय बाबर यांच्याकडे गेल्यावर त्याला व त्याची पत्नी पायलसह कुचेकर कुटुंबीयांना बाबर दांपत्याकडून थेट जिवे मारण्याची धमकी दिली गेली. तसेच ही मुलगी त्यांना विकली असल्याचे सांगून अजून चार ते पाच लाख रुपये द्या व मुलगी घेऊन जा, अशी दमदाटीही बाबर दांपत्याकडून कुचेकर कुटुंबीयांना केली जात होती.
सखोल चौकशी सुरू
“गुरुवारी याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. शुक्रवारी संबंधित बाळ पोलिसांनी ताब्यात घेतले. ते सुखरूप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. असे अपर पोलिस अधीक्षक अजित बोन्हऱ्हाडे यांनी सांगितले.