वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील संसद भवनातील हिंसक आंदोलन चांगलेच अंगलट आले असल्याचे दिसत आहे. काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या काही प्लॅटफॉर्मवरती ट्रम्प यांना कायमस्वरूपाची बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, त्यानंतर आता माहिती तंत्रज्ञान जगतातील सर्वात आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने बुधवारी त्यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलच्या मालकीच्या यूट्यूबने बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएपपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. “सध्या सुरु असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट (व्हिडीओ) काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे,” असं यूट्यूबने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलं आहे. “या चॅनेलवरुन आता ‘किमान’ सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही”, असंही कंपनीने पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. याचाच अर्थ ट्रम्प आता अध्यक्षपदावर असतानाच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणताही व्हिडीओ अपलोड करु शकत नाहीत. २० जानेवारी रोजी म्हणजेच सात दिवसांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहे.
अमेरिकेच्या ‘संसदे’वरील हल्ल्यानंतर मावळते अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्यावर आता उद्योग जगतानेही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले. फेसबुकचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकेरबर्क यांनी ट्रम्प यांना काहीही पोस्ट करण्याची परवानगी देणं धोकादायक ठरु शकतं, असे म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर ट्विटरने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्सची आम्ही समीक्षा केली. त्यांच्या ट्विट्समुळे अमेरिकेत दंगे भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला असे ट्विटरने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल त्यांना अमान्य आहे. तेव्हापासून ते गुरुवारी अमेरिकन संसदेवर हल्ला झाल्यानंतरसुद्धा डोनाल्ड ट्रम्प चिथावणीखोर ट्विट करत होते. फेसबुकच्या माध्यमातूनसुद्धा ते अमेरिकन जनतेला भडकवत असल्याचा आरोप होतोय.
जो बायडन यांचा शपथविधी येत्या २० जानेवारी रोजी होणार आहे. म्हणजे हा शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत ट्रम्प यांच्यावर युट्यूबची बंदी असणार आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान काहीही गडबड होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.