धरणगाव(प्रतिनिधी) शासनाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति शिधापत्रिका 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चना डाळ आणि 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा संच रू. 100/- मात्र या दराने वितरीत करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळी किट वितरणाचे वाटप जिल्हा प्रशासनाकडून सुरू करणेत आले आहे.
धरणगाव तालुक्यात पाळधी येथे आनंदाचा शिधा – दिवाळी किट वितरणाचा शुभारंभ जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अमन मित्तल,यांचे हस्ते संपन्न झाला. पाळधी येथील रास्त भाव दुकानदार सोपान पाटील रास्त भाव दुकान क्र. 24 यांचे दुकानातील लाभार्थ्यांना पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते दिवाळी शिधाजिन्नस संच ( दिवाळी किट ) वाटप करणेत आले. या प्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसिलदार धरणगाव नितीन देवरे,.प्रशांत कुलकर्णी सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी आणि पाळधी येथील रास्त भाव दुकानदार , लाभार्थी आदि उपस्थित होते.
जिल्ह्यातील 6,20,650 शिधापत्रिकांसाठी दिवाळी शिधाजिन्नस संचाचा पुरवठा शासनाकडून होत आहे. या जिन्नसांचा पुरवठा झाल्यावर लगेच रास्त भाव दुकानदारांपर्यंत संच पाठविणेत येत असुन रास्त भाव दुकानांमार्फत या शिधाजिन्नसांचे वाटप करणेत येईल. दिवाळी किटचे वाटप ई-पॅास मशिनद्वारे करण्याचे शासनाच्या सूचना आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्त भाव दुकानातून सदर दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे. प्रति शिधापत्रिका शिधाजिन्नसांचा एक संच देय राहील ज्यामध्ये 1 किलो रवा, 1 किलो साखर, 1 किलो चना डाळ आणि 1 लिटर पामतेलाचा समावेश आहे. प्रति संच किंमत रू. 100 /- मात्र राहील याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. शिधापत्रिकाधारकांनी पुर्ण दिवाळी शिधाजिन्नस संच घ्यावयाचा आहे, या संचामधील वस्तू सुट्या करून वाटू नये असे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटूंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी या दिवाळी शिधाजिन्नस संचाचा लाभ घ्यावा असे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी जळगाव यांनी केले आहे.