जळगाव (प्रतिनिधी) अनुसुचीत जाती व नवबौध्द लोकांना स्वयंमरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. महामंडळातंर्गत बँकेच्या माध्यमातुन 50% अनुदान योजना व बीज भांडवल योजना राबविली जाते. सन 2020-2021 नुसार आर्थिक वर्षाकरीता शासनाकडुन जळगाव जिल्ह्याकरीता 50% अनुदान योजनेतंर्गत 29 लाभार्थी व बीज भांडवल योजनेतंर्गत 34 लाभार्थीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. या कर्ज योजनेचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त इच्छूक उमेदवारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात येवून कर्जमागणीचा अर्ज सर्व कागदपत्रासह सादर करावा. असे आवाहन के. जी. जोपळे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जळगाव यांनी केले आहे.
महात्मा फुले महामंडळ व बँकेतंर्गत 1.50% अनुदान योजना, प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजारापर्यंत असून या योजनेमध्ये बँकेचे कर्ज रुपये चाळीस हजार रुपये व महामंडळाकडुन दहा हजार रुपये अनुदान दिले जाते. बँकेच्या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते, कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.
अर्जदार अनुसुचीत जाती/नवबौध्द संवर्गातील असावा, त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, राज्य महामंडळाच्या योजनेकरीता वार्षीक उत्पन्न मर्यादा शहरी व ग्रामीण भागाकरीता रुपये 1 लाख इतकी आहे. अर्जासोबत जातीचा दाखला व उत्पन्नाचा सक्षम अधिका-यांनी दिलेला दाखला, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायास अनुसरुन इतर अवश्यक दाखले, अवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल, व्यवसायास अनुसरुन आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले, वाहनाकरीता व व्यवसायाकरीता लायसन्स, परवाना, बॅच नंबर इत्यादी, बँकेचे खातेक्रमांक व पासबुकची झेरॉक्स जोडणे आवश्यक आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमदेवारांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. जोपळे, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.