धरणगाव (प्रतिनिधी) ‘एमआयएम’ (MIM) पक्षाचे नॉर्थ महाराष्ट्र सदस्य रय्यान जहागीरदार (जळगाव) यांची चाळीसगाव आणि धरणगाव पालिका निवडणूक पर्यवेक्षक म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, दोन्ही पालिका लढवण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण झाले असून निवडणूक लढण्याबाबत अधिकृत माहिती लवकरच जाहीर करू, असे रय्यान जहागीरदार यांनी ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना सांगितले आहे.
‘एमआयएम’चे नॉर्थ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. खालिद परवेज यांनी नॉर्थ महाराष्ट्र सदस्य रय्यान जहागीरदार यांची चाळीसगाव आणि धरणगाव पालिका निवडणूक पर्यवेक्षक म्हणून निवड केली आहे. जहागीरदार या दोन्ही पालिका निवडणुकीच्या दृष्टीने मागील काही महिन्यांपासून चाळीसगाव आणि धरणगावात चाचपणी करत होते. रय्यान जहागीरदार हे मागील काही महिन्यापासून धरणगाव आणि चाळीसगावला कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यानुसार त्यांनी धरणगावात अनेक मोहल्ल्यांमधील युवकांचे म्हणणे ऐकून घेतले. निवडणूक लढण्याबाबत चर्चा केली. तसेच चाळीसगावातही ‘एमआयएम’ धरणगावप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाल्याचे रय्यान जहागीरदार यांनी सांगीतले. तसेच आमच्या पक्षाचे चाळीसगाव आणि धरणगावमध्ये सर्वेक्षण झाले असून निवडणूक लढण्याबाबत लवकरच अधिकृत माहिती लवकरच जाहीर करू असेही त्यांनी सांगितले. यानिमित्ताने धरणगाव पालिकेची निवडणूक ‘एमआयएम’ लढण्याच्या शक्यतेला अधिकचे बळ मिळाले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यापाठोपाठ औरंगाबादमध्ये लवकरच एमआयएमची सभा होणार आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी यासंदर्भात सुतोवाच केले होते. यावेळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी औरंगाबाद येथे सभेनिमित्त आल्यावर चाळीसगाव,धरणगावसह जिल्ह्यातील पालिका निवडणूक लढण्याबाबत चर्चा होणार असल्याचे कळते. औरंगाबादच्या सभेनंतर धरणगाव पालिकेच्या रिंगणात ‘एमआयएम’ उतरणार की, नाही? यावर शिक्कामोर्तब होणार आहे. दरम्यान, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेणार असल्याच्या वृत्ताला नाव न सांगण्याच्या अटीवर धरणगावच्या दोन माजी नगरसेवकांनी आधीच दुजोरा दिलेला आहे. दरम्यान, पालिकेच्या प्रभाग रचनेत मुस्लीम समाजाची मते मुद्दाम विखुरण्यात आल्याच्या आरोपानंतर पालिकेच्या राजकाणात ‘एमआयएम’ उतरल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे धरणगावच्या प्रभाग रचनेत मुद्दाम फेरफार केल्याचा आरोप होत आहे.