जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या केळी क्लस्टर विकास कार्यक्रमातर्गत देशात ५३ क्लस्टरपैकी एक केळी क्लस्टर जळगाव येथे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याची माहिती केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी दिली.
जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी आमदार सुरेश भोळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे उपस्थित होते. यावेळी माहिती देतांना त्यांनी सांगितले कि, भारताच्या फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने क्लसटर विकास कार्यक्रमातर्गत ५३ फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आखली आहे. या साठी देशात राजस्थान राज्यातील जलोरे बारमेर, महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात केळी व कापूस हे मुख्य पीक आहेत. रावेर, यावल, चोपडा मुक्ताईनगर या तालुक्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते. हा भाग देशातील सर्वात मोठा केळी पुरवठादार आहे. इराण, इराक, अफगणिस्तान, दुबई, बहरीन, अझरबैझान, कुवैत आदी देशामध्ये रावेर परिसरातून केळीचा निर्यात केली जात आहे. क्लस्टर विकास कार्यक्रमातर्गत प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब, पायाभूत सुविधा उभारणी, आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी उपाययोजना केल्या जातील जळगावातील हा पायलट प्रकल्प असून तो आदर्श प्रकल्प ठरणार आहे. फलोत्पादन क्षेत्रातील शाश्वत विकासाचा हा आदर्श निर्माण करणार आहे. राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ व स्थानिक प्रशासन या प्रकल्पाच्या यशासाठी एकत्रित प्रयत्न करतील व जळगाव हे फलोत्पादन क्षेत्रातील मोठे हब बनेल असा विश्वासही रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. भविष्यात चांगल अंतरराष्ट्रीय मार्केट कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न सुरु आहे. जास्तीत जास्त केळी बाहेरच्या देशांमध्ये कसे निर्यात करता येईल, या उद्दीने प्रयत्न सुरु आहे. रशियात केळी पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बनाना कलस्टर जळगाव येथे येणे आवश्यक होते.