मुंबई (वृत्तसंस्था) अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या दाखल्यावर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद आणि धर्म मुस्लिम असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी वानखेडे यांचा जन्म दाखला सोशल मीडियात व्हायरल झाला होता. त्यावेळी सोशल मीडियात व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे असा इशारा देखील वानखेडे यांनी दिला होता. त्यामुळे आज, गुरुवार सकाळपासून सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्या बाबत वानखेडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर समीर वानखेडे यांचं समीर दाऊद वानखेडे असं नाव असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवाय यावर समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं देखील निदर्शनास येत आहे. एक दाखला सेंट जोसेफ हायस्कूल वडाळा, तर दुसरा सेंट पॉल हायस्कूल दादर या शाळांचा आहे. दरम्यान, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत या दाखल्याबाबत उल्लेख केलाय. आपल्याकडील पुरावे कोर्टात दाखल केल्याचं यावेळी मलिक यांनी सांगितलं.