मुंबई (वृत्तसंस्था) पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. आता शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. सचिन वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
अँटीलिया स्फोटक सापडलेल्या कारचा मालक मनसुख हिरेन प्रकरणात अटक झालेले सचिन वाझे यांनी आता हायकोर्टात धाव घेतली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझे यांनी मुंबई हायकोर्टात तसा अर्ज दाखल करून आपल्या अटकेला बेकायदा म्हटले आहे. राष्ट्रीय तपास संस्था NIA ने आपल्याला केवळ संशयाच्या आधारावर अटक केली. हे चुकीचे आहे. हायकोर्टाने त्यांची याचिका सुनावणीसाठी मान्य केली असून लवकरच त्यावर सुनावणी होणार आहे. याच दरम्यान, शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेनेने आपल्या अग्रलेखात लिहिले की, सचिन वाझे यांना अखेर अटक केलीच याचा काही लोक आनंद साजरा करत आहेत. वाझे यांचे काही चुकले असेल किंवा स्फोटकांप्रकरणी त्यांचा काही संबंध असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिस, दहशतवाद विरोधी पथक सक्षम होते. पण, केंद्रीय पथकाला तसे होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझेंना अटक करून महाराष्ट्र पोलिसांचा अपमान केला. हे सर्व काही ठरवून करण्यात आले आहे. सत्य लवकरच बाहेर येईल. महाराष्ट्राच्या एखाद्या प्रकरणात नाक खुपसण्याची संधी केंद्र सरकार सोडत नाही.
अर्णबच्या अटकेचा बदला घेतला – शिवसेना
शिवसेनेने पुढे लिहिले, की अँटीलिया प्रकरणात सचिन वाझेंना अटक केल्याचा भाजपला जो आनंद होत आहे तो शब्दांत मांडता येणार नाही. काही महिन्यांपूर्वी सचिन वाझे यांनीच रायगड पोलिसांच्या मदतीने भाजपचा ‘महंत’ असलेल्या अर्णब गोस्वामीला अटक केली होती. अन्वय नाइक प्रकरणात त्याला तुरुंगात डांबले होते. त्यावेळी गोस्वामीचे नाव घेऊन लोक रडगाणे करून वाझे यांना शाप देत होते. थांबा, केंद्रात तर आमचीच सत्ता आहे, आम्ही पाहून घेऊ’ असेही म्हटले होते. तीच संधी आता साधून घेतली आणि एक प्रकारे सूड उगवला असे शिवसेनेने म्हटले आहे.
२५ मार्चपर्यंत NIA च्या हवाली वाझे
सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने १४ मार्च ते २५ मार्च पर्यंत NIA च्या हवाली केले आहे. त्यांना अँटीलिया जवळ स्फोटके सापडल्याच्या प्रकरणात शनिवारी रात्री उशीरा अटक करण्यात आली होती. तत्पूर्वी शुक्रवारीच वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. पण, प्राथमिक पुरावे त्यांच्या विरोधात असल्याचे सांगताना सत्र न्यायालयाने ती मान्य केली नाही. तसेच यावर पुढील सुनावणी १९ मार्च पर्यंत स्थगित केली.
आणि अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा ‘स्फोट’ झाला!
सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, मुंबई पोलीस दलातील एक तपास अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्या गाडीत जिलेटिनच्या वीस कांड्या होत्या. त्यामुळे खळबळ माजली. अंबानींचे नाव आल्यामुळे हे सर्व प्रकरण पोलिसांनी फारच मनावर घेतले. हे सर्व का झाले, कसे झाले यावर चर्चा सुरू झाल्या, पण काही दिवसांतच या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडल्याने अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा ‘स्फोट’ झाला आहे, असं लेखात म्हटलंय.