मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते मुंबईतील आयईएस राजा शाळेत ध्वज फडकवण्यात आला. यादरम्यान, त्यांनी भारताच्या आर्थिक स्वातंत्र्याबद्दल भाष्य केलं. “आपण इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा वापर करतो. मात्र मुळात हे भारतातलं नाही. आपण कितीही चीनबद्दल ओरडत राहू, आपल्या फोनमधील ज्या वस्तू आहेत त्या चीनमधून येतात. जिथपर्यंत आपण चीनवर अवलंबून राहू, तोपर्यंत चीनसमोर झुकावं लागेल, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.
“कोणत्याही परकीय आक्रमकाचे पाय आपल्या भूमीवर पडले की संघर्ष सुरु व्हायचा. आक्रमकांनी आपल्या देशावर अनेक वेळा हल्ला केला. आपण १५ ऑगस्टला त्याला पूर्णविराम दिला आहे. लढाई लढणारे महान पुरुष आपल्याला प्रेरणा देतात. त्यांची आठवण करण्याची ही वेळ आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर आपण आपलं जीवन जगण्यास मोकळे झालो”, असंही मतंही सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं.
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केलं. २१ व्या शतकात भारताला स्वप्न पूर्ण करण्यास रोखू शकत नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं. चीन आणि पाकिस्तानचं नाव न घेता त्यांनी हे मत मांडलं. कोरोना काळात भारतात होत असलेल्या विक्रमी लसीकरण मोहिमेविषयी देखील पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला.