छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) कार्यालयातील संगणक दुरुस्तीचे बिल मंजूर करून ते काढण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील लेखाधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शुक्रवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. महेश भालचंद्र चौधरी (लेखाधिकारी वर्ग – २) असे संशयित आरोपीचे नाव आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील संगणक दुरुस्ती व देखभालीचे काम भोकरदन येथील ओम एंटरप्राइजेस यांना देण्यात आले आहे. त्यांनी या कार्यालयातील संगणक दुरुस्ती, प्रिंटर दुरुस्ती तसेच संगणकांमध्ये नवीन अँटिव्हायरस टाकणे आदी काम केले होते. या कामाचे ६५ हजार १५६ रुपयांचे बिल मंजूर करून ते ट्रेझरीमध्ये पाठविण्यासाठी लेखाधिकारी महेश चौधरी याने तक्रारदारकडे चार हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
यानंतर तक्रारदाराने लेखाधिकारी चौधरी यांच्याशी संपर्क साधून लाच देण्यास तयार असल्याचे सांगून पैसे कुठे घेऊन येऊ?, अशी विचारणा केली. त्यावर कार्यालयातच त्यांना बोलावून घेण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कार्यालयाच्या आवारातच त्याने तक्रारदारकडून चार हजार रुपये स्वीकारले. लाचेचे पैसे दिल्यानंतर तक्रारदारने डाव्या हाताने डोके खाजवताच चौधरीला पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक संगीता पाटील, हवालदार दिगंबर पाठक, साईनाथ तोडकर, पोलीस अंमलदार विलास चव्हाण, देवसिंग ठाकूर आदींच्या पथकाने केली