भुसावळ (प्रतिनिधी) तृतीयपंथीय एका समाजाची बदनामी करीत असल्याच्या संशयातून त्यास लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच केस कापण्यात आल्याची घटना फेकरी टोल नाक्याजवळील खुशबु हॉटेलमागे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याप्रकरणी बाबा काल्यासह सहा संशयितांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशफाक जाबीर बागवान उर्फ आम्रपाली जोगी (26, खडका रोड, दत्तनगर, कविता लॉण्ड्रीजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, दानिश शेख, बाबा काल्या व सोनू शेख (खडका रोड, भुसावळ) व अन्य तिघांनी शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता फेकरी टोल नाक्याजवळील खुशबु हॉटेलमागे आम्रपाली जोगी हिस बेदम मारहाण केली. तसेच लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी मारहाण करीत दुखापत करीत एका समाजाची, किन्नरची बदनामी का करते? म्हणून जाब विचारला. तसेच डोक्याचे केस धारदार वस्तूने कापले. याप्रकरणी संशयितांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. तपास हवालदार योगेश पालवे करीत आहेत