मालेगाव (प्रतिनिधी) येथील महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांना ३३ हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी अटक केली. तक्रारदार ठेकेदाराकडे सहाय्यक आयुक्त महाले यांनी जुन्या बांधकामाची चार देयके तसेच वॉर्ड नंबर १९ मधील वॉल कंपाउंडचे बजेट मंजूर करून देण्यासाठी ३३ हजारांची मागणी केली होती. दरम्यान, महालेच्या घरझडतीत रोख रक्कम १३ लाख १० हजार तसेच १३३ ग्रॅम सोने मिळून आले. त्याला २ दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.
महापालिकेच्या बांधकाम ठेकेदाराने महालेच्या माध्यमातून बिले मंजूर करण्यासाठी पाठपुरावा केला होता. या कामासाठी महाले याने एकूण रकमेच्या चार टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती, अशी तक्रार सदर ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. या अनुषंगाने नाशिक येथील विभागाने सापळा लावला होता. तक्रारदाराने महापालिका मुख्यालय इमारतीत महालेला रोख ३३ हजारांची रक्कम स्वीकाराताच पोलिस पथकाने त्यास अटक केली.
या प्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा महालेविरोधात किल्ला पोलिस ठाण्यात सचिन महाले गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, नंतरच्या कारवाईत महाले याच्या वर्धमाननगर येथील घराची झडती घेतली असता पोलिसांना त्यात रोख रक्कम रक्कम १३ लाख १० हजार, सोन्याचे तीन कॉइन व एक सोन्याचा तुकडा असे एकूण १३३ ग्रॅम सोने मिळून आले आहे. महालेच्या विविध स्थावर व जंगम मालमत्तांचा शाेध घेत असून त्याने ज्ञात स्त्राेतापेक्षा जास्त संपत्ती मिळविली आहे का, याचा सखाेल तपास केला जात आहे.