जळगाव (प्रतिनिधी) दुपारी झालेल्या वादाची खून्नस काढण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रधारी टोळक्याने तीन जणांच्या घरावर तलवारींनी हल्ला केला. ही घटना शिवाजी नगरातील हुडको, धनाजी काळे नगर व मकरा अपार्टमेंट परिसरात घडली. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. परंतू पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
नेमकं काय घडलं ?
शहरातील एमआयडीसी परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन गटात वाद झाले. परंतू पोलिसांनी या घटनेची दखल न घेतल्यामुळे त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास शिवाजी नगरात पुन्हा हे दोन्ही गट एकमेकांच्या घरी जावून भिडले. त्यानंतर एका गटातील सुमारे दहा ते पंधरा जणांचे टोळके दुचाकीने हातात तलवारी घेवून शिवाजी नगर परिसरातील लक्ष्मीनगरात गेले. याठिकाणी त्यांनी शिवीगाळ एका जणाच्या घरावर हल्ला चढविला. त्यानंतर हीच टोळी मकरा अपार्टमेंट समोरील परिसरात गेली. याठिकाणी हल्लेखोरांनी अज्ञात व्यक्तीच्या घरावर त्यांनी तलवारींनी हल्ला चढवित दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
घराच्या गेटवर वार करीत हल्लेखोर तेथून पसार !
धनाजी काळे नगरात राहणाऱ्या विशाल वाघ या तरुणाच्या घराच्या दिशेने निघाले. या टोळक्याने शिवीगाळ करीत विशाल वाघ याच्या घरावर हल्ला चढविला. यातील एका तरुणाने तलावार घेवून विशाल वाघ याच्या घराच्या गेटवर वार करीत हल्लेखोर तेथून पसार झाले. जुन्या वादातून हल्ला झाल्याची शक्यता धनाजी काळे नगरात झालेल्या हल्ल्यातील विशाल वाघ यांचा रेल्वेमध्ये कंत्राटदार आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांचा वाद झाला होता, परंतू सामंज्यसपणातून त्यांनी हा वाद मिटविला होता. परंतू आता त्यांच्या घरावर हल्ला झाला असल्याने त्याच वादातून झाला असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
महामार्गालगतच्या जागेमुळे वादाची ठिणगी !
मंगळवारी दुपारच्या सुमारास महामार्गालगत असलेल्या जागेच्या कारणावरुन एमआयडीसी परिसरात दोन गटात वाद झाले. याठिकाणी या गटाने तरुणावर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे याठिकाणी दोन गट एकमेकांना भिडले होते. या वादाचे पडसाद रात्रीच्या सुमारास शिवाजी नगरात उमटल्याने या घटनेला जागेच्या वादाची किनार असल्याची चर्चा पोलिसांमध्ये सुरु होती.