जळगाव (प्रतिनिधी) वडिलोपार्जीत जागा खाली करावी म्हणून न्यायालयात केलेल्या दाव्याचा निकाल विरोधात गेला म्हणून एका महिलेवर जादूटोणा (Black Magic In Jalgaon) केल्याच्या आरोपातून पाच जणांविरुद्ध अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात शिवाजी नगर दालफड परिसरातील रहिवासी अंजली केदार भुसारी वय-३९ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घराशेजारी राहणारे 1) प्रकाश रामेश्वर व्यास व त्यांची पत्नी 2) ललिता प्रकाश व्यास 3) सुशिला गोपाळ पंडित 4) विद्या गोपाळ पुरोहित 5) गौरीलाल रुपचंद पुरोहित हे गेल्या शेजारी ४० ते ४५ वर्षापासून राहतात. सदरची जागा ही अंजली भुसारी यांची वडीलोपार्जीत जागा आहे. त्यांचे आजल सासरे यांनी वरील तिघांना सदरची जागा ही वापरण्यास दिलेली होती. त्यानंतर सन २००७ मध्ये सौ. केदार यांचे सासरे व पती यांनी वरील लोकांना त्यांना दिलेली जागा खाली करण्यास सांगितले. परंतू पाचही जणांनी याबाबत नकार दिला. त्यामुळे सन २००७ मध्ये जागेचा ताबा मिळावा म्हणून किशोर नारायण भुसारी यांनी जळगाव न्यायालयात वरील लोकांविरुध्द दिवाणी स्वरुपाचा खाजगी दावा दाखल केला होता. खटल्याचा निकाल सन २०१७ मध्ये भुसारी यांच्या बाजूने लागला. तेव्हापासून वरील लोक हे भुसारी यांच्या घराच्या दरवाज्याजवळ उडिद, मोहरी तसेच रक्षा असे टाकून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करीत होते.
दि.३० मे रोजी अमावस्याच्या दिवशी दुपारी ३ वाजेच्या दरम्यान अंजली भुसारी यांच्या घराच्या गेटवर कोणीतरी मानवी केस व हळद कुंकू टाकलेले दिसले. त्यानंतर रात्रीच्या वेळेस लाईट गेल्यानंतर जनरेटर सुरू होण्याच्या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसम हे आमचे घरावर दगड मारत होते. काही दिवस गेल्यानंतर दि.१४ जून पौर्णीमेच्या सकाळी ६ वाजेच्या सुमारास सौ. भुसारी या रात्री वाळत घातलेले कपडे काढायला घराच्या समोरील ओपन स्पेसमध्ये गेले तेव्हा वाळत घातलेल्या त्यांच्या गाऊनवर रक्त टाकलेले दिसले. त्यानंतर दि.२८ रोजी दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान लाईट गेलेली होती. एक तासानंतर सौ. भुसारी या बाहेर निघाल्यावर लक्षात आले की, गेटावरुन कणकेचा गोळा त्यावर काळी बाहुली हळद कुंकू वाहिलेली, त्यावर पिवळ्या अक्षरामध्ये अंजली नाव लिहीलेले आहे.
एवढेच नव्हे तर, त्यासोबत काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या बांधलेल्या त्या बाहुलीच्या अंगावर ठिकठिकाणी पिवळ्या रंगानी फुली करून ठिकठिकाणी सुया टोचलेल्या असे समोर पडले. त्यामुळे अंजली भुसारी यांनी 1) प्रकाश रामेश्वर व्यास व त्यांची पत्नी 2) ललिता प्रकाश व्यास 3) सुशिला गोपाळ पंडित 4) विद्या गोपाळ पुरोहित 5) गौरीलाल रुपचंद पुरोहित यांनी संगनमत करुन आमची वडिलोपार्जित जागा त्यांनी खाली करावी म्हणून आम्ही त्यांचेविरुध्द न्यायालयात केलेल्या दाव्याचा निकाल आमच्या बाजूने लागल्याचे कारणावरुन वरील लोकांनी दि.३ फेब्रुवारी २०२२ ते दि.२८ जून २०२२ पावेतो प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी आमच्या घराच्या दाराजवळ मानवी केस व हळद कुंकू टाकलेले, काळी बाहुली हळद कुंकू वाहिलेली त्यावर पिवळ्या अक्षरामध्ये अंजली नाव लिहीलेली व त्यासोबत काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या बांधलेल्या त्या बाहुलीच्या अंगावर ठिकठिकाणी पिवळ्या रंगानी फुली करुन ठिकठिकाणी सुया टोचलेल्या असे टाकुन सौ. भुसारी यांना घाबरवण्याचा अथवा त्यांच्या जिवाचे बरे वाईट होण्याच्या उदेदशाने वरील कृत्य केल्याबाबत तक्रार केली. त्यानुसार संबंधित पाचही जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंध कायदा अधिनीयम 2013 कलम 3(2) सह भादवी कलम 336 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.